अकोला - आदिवासीबहुल किंवा अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचा आनंद वेगळाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी शनिवारी येथे आयोजित आर्थोपेडिक डॉक्टरांच्या परिषदेत केले. कुठलीही साधन सामग्री नसताना दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देताना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात या बाबतचे अनुभव त्यांनी शनिवारी डॉक्टरांना सांगितले. अकोला आर्थोपेडिक सोसायटीद्वारा आयोजित तीन दिवसीय महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबतच पत्नी डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. अविनाश पाटील, डॉ. मनोज पहुकर व डॉ. आशीष बाभूळकर उपस्थित होते. डॉ. आमटे यांनी अनुभव कथन करताना डॉक्टरांनी दुर्गम भागात आरोग्य सेवा देताना रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करावे आणि त्यांनी कशाप्रकारे उपचार केले, याबाबतचे अनुभव परिषदेतील डॉक्टरांसमोर मांडले. दुर्गम भागात सेवा देत असताना पहिली प्रसूती कशाप्रकारे केली, तसेच या भागातील लोकांना त्रास सहन करण्याची शक्ती असल्यामुळे त्यांना आरोग्य सेवा देण्यात यश प्राप्त झाले. विद्युत व्यवस्था नसल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठलीही साधन सामग्री नव्हती, तसेच एखाद्या झाडाखाली शस्त्रक्रिया करावी लागत होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या पायाला ह्यफ्रॅरह्ण असल्यास बधिरीकरण करण्याचे कुठलेही औषध उपलब्ध नव्हते. त्यांना त्रास सहन करण्याचे सांगून या भागातील लोकांवर उपचार केल्याचे डॉ. आमटे यांनी सांगितले. प्रचंड अडचणींवर मात करून दुर्गम भागात आरोग्य सेवा देणे हे मोठे आव्हान होते; मात्र येथील लोकांवर उपचार करताना त्यांच्या ओठावरचे स्मित पाहून हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचा वेगळाच आनंद
By admin | Updated: November 9, 2014 00:38 IST