बोगस रस्ता बांधकामाबाबत लोकमतने १ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता नितीन नाकट यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी केली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी कंत्राटदार राहुल सावजी यांच्याबाबत रोष व्यक्त केला.
यावेळी कार्यकारी अभियंता नाकट यांनी रस्त्याचे बांधकाम दर्जेदार केले जाईल. असे गावकऱ्यांना आश्वासन दिले. पिंजर-निहिदा रस्त्याचे बांधकाम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू झाले असून दोन वर्षांची कालमर्यादा असतानाही काम पूर्ण झाले नाही. या कामाचा कंत्राट राहुल सावजी नामक कंत्राटदाराने घेतला असून त्यांनी सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले नसल्याने ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. डांबरीकरणाचे काम बोगस आणि मातीवर केल्या जात असल्याने दोन महिला सरपंचासह नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी गत आठ दिवसापासून काम बंद केले होते. कार्यकारी अभियंता नाकट यांनी मंगळवारी कामाची पाहणी केली. कंत्राटदार राहुल सावजी यांनी मातीवर डांबरीकरण कसे केले. हे अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी उखडून दाखविले.कंत्राटदार सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित लोकांचे ऐकत नाही. उद्धट बोलतात. कंत्राटदार अंदाजपत्रकाप्रमाणे काम करीत नसल्याचा आरोप लोकांनी केला. अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम करावे, कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली. कार्यकारी अभियंता नितीन नाकट, शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांनी दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच विजय पाटील ठाकरे, अविनाश ठाकरे, किरण ठाकरे, उदय ठाकरे, जितू पाटील, देविदास ठाकरे, नितीन सोनटक्के, संतोष सोनटक्के, प्रमोद ठाकरे, मनोहर राठोड, गणेश कराळे, जितू आडे, दिलीप घुमसे आदी उपस्थित होते.
फोटो: