अकोला : महापालिका अधिकार्यांनी सप्टेंबरमध्ये जुने बस स्थानक येथे राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान स्थानकाच्या हद्दीत व्यवसाय करणार्यांची दुकाने उद्ध्वस्त केली होती. त्याबद्दल व्यावसायिकांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत याचिका दाखल केली. त्यावरून आज मंगळवारी मानवाधिकार आयोग समितीच्या अधिकर्यांनी जुन्या बस स्थानकाची पाहणी करून व्यावसायिकांशी चर्चा केली. महापालिकेने २५ सप्टेंबर रोजी जुन्या बस स्थानकावर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एसटी महामंडळासोबत करार करून स्थानकाच्या हद्दीतच व्यवसाय करणार्या आठ व्यावसायिकांची दुकाने पाडली. यासंदर्भात सर्व व्यावसायिकांनी मानवाधिकार आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेवरून ११ नोव्हेंबर रोजी आयोगाचे अधिकारी विजयकुमार गडलिंगे, माजी न्यायाधीश अनिल वैद्य व विजयकुमार गवई यांनी व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्यांच्यासोबत चर्चा केली. अनिल वैद्य यांनी व्यावसायिकांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी फतेह चौक संघर्ष असोसिएशनच्यावतीने अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
मानवाधिकार आयोगाच्या अधिका-यांनी केली जुन्या बस स्थानकावर पाहणी
By admin | Updated: November 12, 2014 01:04 IST