अकोला : कुरणखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द तक्रारींच्या मुद्द्यावर शुक्रवारी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत विचारणा करण्यात आली. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सभेत दिली.
कुरणखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशीचे काय झाले, अशी विचारणा सदस्यांनी सभेत केली. त्यानुषंगाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द करण्यात येत असलेल्या चाैकशीचा अहवाल तीन दिवसात आरोग्य समितीकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विजय जाधव यांनी सभेत दिली.
समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, अनंत अवचार, डाॅ. गणेश बोबडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विजय जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.