अकोला: भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी छात्रसंघाची निवडणूक खुली करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्या दिशेने शासनाने विचारही सुरू केला; परंतु पूर्वीप्रमाणेच महाविद्यालय विद्यार्थी छात्रसंघ निवडणूक ३ सप्टेंबर रोजी होणार होती; परंतु शासनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमधील निवडणुका पुढे ढकण्याचा आदेश दिला आहे. यामागे खुल्या पद्ध तीने महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्याचा शासनाचा विचार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी महाराष्ट्रात महाविद्यालयीन विद्यार्थी छात्रसंघाच्या खुल्या निवडणुका होत. यामध्ये राजकीय, बिगर राजकीय विद्यार्थी संघटनांसह पक्षही सक्रिय सहभाग घेत. पुढे गलिच्छ राजकारण आणि गटातटातील वैमनस्यामुळे या निवडणुकांना सशस्त्र संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाल्याने, शासनाने खुल्या पद्धतीच्या महाविद्यालयांमधील निवडणुका बंद केल्या. मध्यंतरी महाविद्यालयीन निवडणुका होत नसल्याने विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना वाव मिळत नसल्याची चर्चा सुरू झाली. भाजपची सत्ता आल्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा महाविद्यालयीन निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्याचा शासन विचार करीत आहे. त्या दृष्टिकोनातून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील विद्यार्थी संघटनांनीसुद्धा महाविद्यालयीन निवडणुका घेण्याची मागणी केली होती; परंतु शासनाने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. गुणवत्तेच्या आधारावर वर्ग प्रतिनिधींमधूनच विद्या पीठ प्रतिनिधी निवडीची निवडणूक घेण्याचा हालचाली विद्यापीठांनी सुरू केल्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ प्रतिनिधीची निवड करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती; परंतु शासनाने विद्यापीठाला आदेश देऊन या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. गणेश मालटे यांनी अमरावती विभागामधील सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून कळविले आहे.
छात्रसंघाची खुली निवडणूक घेण्याचा शासनाचा विचार!
By admin | Updated: September 1, 2015 01:58 IST