ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा) : पावसाअभावी विदर्भात जवळपास ८0 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसाअभावी पिकं करपली असून, करपलेल्या पिकांमध्ये वखर घालण्याऐवजी बळीराजा त्या पिकांवर जनावरांची भूक भागवित असल्याचे वास्तव समोर आले आहे. विदर्भात मृग नक्षत्राच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खरीपाची पेरणी आटोपली; मात्र पेरणीनंतर एक महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे विदर्भातील सुमारे ८0 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी संकटात सापडली आहे. कमी पावसाचा फटका केवळ शेतकर्यांनाच नाही तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. जनावरांची चार्यासाठी तर शेतकर्यांची पशुधन वाचविण्यासाठी व मिळेल तेथून चारा आणण्यासाठी भटकंती सुरू आहे. पश्चिम वर्हाडात एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरे आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१ व वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ जनावरे आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मेंढय़ा १ लाख २९ हजार ८३९, शेळ्या २ लाख ६७ हजार ४५१ व इतर जनावरे ६ लाख १६ हजार ३९८ आहेत. एकूण १0 लाख १३ हजार ६८८ पशुधन एकट्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. वाशिम जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८६२ मोठी जनावरे असून, ६२ हजार ७८१ छोटी जनावरे आहेत. लाखो जनावरांच्या तोंडाला दिवसाकाठी १0 लाख टनापेक्षा जास्त चारा लागतो. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांवर वखर चालविण्यापेक्षा, या पिकांचा वापर जनावरांना चारण्यासाठी केला जात असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे. *जनावरांचे खाद्य विकत घेणे कठीण पावसाने उघडीप दिल्याने रानावनात गवत उगवले नाही. परिणामी गुरांचे चार्याअभावी हाल होत आहे. सध्या ढेप १ हजार ४ रुपये क्विंटल तर तुरीचे कुटार १ हजार ३00 रुपये क्विंटल दराने विकले जात आहे. तूरीचे कुटार, कडबा कुट्टी, ढेप, सरकी हे जनावरांचे खाद्यही महागल्याने ते विकत घेणे शेतकर्यांना कठीण झाले आहे. चार्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने पश्चिम वर्हाडातील १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांचे भविष्य बिकट असल्याचे चित्र दिसत आहे.
करपलेल्या पीकावर भागविली जाते जनावरांची भूक !
By admin | Updated: July 20, 2015 23:09 IST