लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाळापूर नाक्यावरील अनंतनगरात दीड लाख रुपयांची घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाळापूर नाक्यावरील अनंतनगरात राहणारे नीलेश नरवाडे (३२) हे बुधवारी कुटुंबासह लग्नासाठी तेल्हारा येथे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या बंद घरातील दरवाजाचा कडीकोंडा वाकवून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंग, लहान मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठ्या आणि रोख आठ हजार रुपये, असा एकुण दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नरवाडे हे सकाळी घरी परतल्यावर त्यांना घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
दीड लाखांची घरफोडी, दागिने, रोकड लंपास
By admin | Updated: May 19, 2017 01:28 IST