संतोष येलकर/अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ४५00 म्हणजेच एकरी केवळ १८00 रुपये मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी १५ हजारांवर खर्च येत असताना, त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असून मदतीच्या नावाखाली दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर रोजी दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय निधीचे वितरणही करण्यात आले. ५ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी हेक्टरी ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी नऊ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये शेतकर्यांना मदत दिली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत हेक्टरी ४ हजार ५00 रुपये म्हणजेच एकरी १ हजार ८00 रुपये मदत दिली जात आहे. वास्तविक, शेतीच्या मशागतीपासून तर कापणी-मळणीपर्यंत खर्चच कमीत कमी एकरी १५ हजार रुपयांचा येतो. त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी एकरी १८00 रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी येत्या पावसाळ्यापर्यंंत संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुरेल एवढी नव्हे, तर किमान पिकांसाठी केलेल्या खर्चाची भरपाई करणारी मदत मिळावी, अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे. शेतीची मशागत, पेरणी, कापणी व मळणीपर्यंंत पिकांसाठी एकरी १५ ते २0 हजार रुपयांचा शेतकर्यांना खर्च करावा लागतो. सरकारकडून कोरडवाहू शेतकर्यांना हेक्टरी ४५00 रुपये म्हणजेच एकरी १८00 रुपयांची मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी लागणारा खर्च आणि त्या तुलनेत सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे , भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे यांनी स्पष्ट केले.
तुटपुंज्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पुसली पाने
By admin | Updated: January 20, 2015 00:34 IST