सचिन राऊत /अकोला: राज्यात प्रचंड खळबळ माजविणार्या स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी असलेल्या आरोग्य यंत्रणेने वरिष्ठ स्तरावरून ठरवून दिलेल्या मानकांना डावलून विलगीकरण वॉर्डाची निर्मिती केली आहे. ही बाब सवरेपचार रुग्णालयातील रुग्णांसह नागरिकांना प्रचंड धोक्याची असून, योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने स्वाइन फ्लूच्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच एक पॉझिटिव्ह व चार संशयित रुग्ण वाढले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतीच असल्यावरही या वॉर्डात व्हेंटिलेटर वगळता इतर कोणतीच सुविधा नसल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने रविवारी केलेल्या पाहणीत समोर आले आहे.पुणे ग्रामीणमध्ये स्वाइन फ्लूने शेकडो रुग्णांना आपल्या कवेत घेतले असून, त्यानंतर नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक या जिल्हय़ानंतर अकोला जिल्हय़ाला लागून असलेल्या वाशिम आणि अमरावती येथेही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरेश सिंह आणि वाशिम जिल्हय़ातील गरोदर महिला अरुणा रामप्रकाश अवचार यांना प्रथम स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या दोन्ही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक होते. मात्र स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी असलेल्या आरोग्य यंत्रणेने सुरेश सिंहला वसतिगृहात तर महिलेला गरोदर महिलांच्या वॉर्डात ठेवले. त्यामुळे या दोन रुग्णांच्या संपर्कात आल्याने वाशिम जिल्हय़ातीलच गर्भवती महिला जयश्री हरीश वानखडे (१९), योगीता सुनील राक्षसकर (२१) आणि तेल्हारा येथील रहिवासी सुनील सुधाकर कोकाटे यांनाही स्वाइन फ्लूची लक्षणे आढळली आहेत. आरोग्य खात्याने २५ जानेवारी रोजी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विलगीकरण वॉर्डाची निर्मिती करण्याचे परिपत्रक आरोग्य उपसंचालक कार्यालयानेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ फेब्रुवारी रोजी दिले. मात्र त्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वानुसार विलगीकरण वॉर्डाची निर्मिती न केल्याचे वास्तव समोर आले आहे. यावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन स्वाइन फ्लू आजाराबाबत अद्यापही गंभीर नसल्याने दोन रुग्णांवरून ही संख्या सहा रुग्णांवर गेली असल्याचे समोर आले आहे.
‘स्वाइन फ्लू’ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा कुचकामी
By admin | Updated: February 16, 2015 02:06 IST