- विजय शिंदेअकोट (जि.अकोला): अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सर केले. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडसाच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करीत धीरजने भारताचा तिरंगा ध्वज प्रजासत्ताकदिनी पहाटे दिमाखाने फडकविला. सोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचा भगवा ध्वज आणि भारताचे क्रमांक-१ चे मराठी दैनिक ‘लोकमत’चा फलकही झळकविला. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला भारतीय दिव्यांग आहे.आफ्रिका खंडातील किलीमंजारो हा सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील ईशान्य भागातील केनियाच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची १९ हजार ३४१ फूट म्हणजेच ५ हजार ८९५ मीटर आहे. विशेष म्हणजे, हा जगातील सर्वात उंच पर्वत असून, बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमस्खलन होत असते. हा पर्वत सरळ उभा असल्याने वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे शिखर सर करण्यासाठी २६ जानेवारीची पहाट उजाळली. धीरज हा मुंबई येथून आपल्या चमूसह २१ ला टान्झानियाला रवाना झाला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पूर्वतयारी करून सर्व साहित्यासह बेस कॅम्प पार करीत २३ जानेवारी रोजी किलीमंजारो शिखराच्या चढाईला सुरुवात केली. पहाटे शिखरावर पोहोचल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्वतयारीनिशी गेलेल्या धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात प्रजासत्ताकदिनी पहाटे भारताचा तिरंगा तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकविला. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीताचे गायन केले. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा सदर शिखर सर करणे अनेक वेळा अशक्यप्राय ठरते; मात्र दिव्यांगसुद्धा जगाच्या पाठीवर कुठंही कमी नसल्याचे धीरजने दाखवून दिले. यापूर्वी धीरजने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. ही मोहीम पुणे पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांचा नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यामध्ये दिव्यांग धीरज कळसाईत सोबतच पिंपरी चिंचवडचे साई कवडे (वय ९ वर्षे), मुंबईच्या प्रियंका गाडे, नवी मुंबई पोलीस दलातील व साताराचे मूळ रहिवासी तुषार पवार यांनीदेखील ही मोहीम यशस्वी पूर्ण केली. या मोहिमेसाठी विशेष सहकार्य ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी केले.माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्दसाहसवीर धीरजच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. भूमिहीन असून, वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आर्थिक स्रोत नसल्याने २०१५ मध्ये बहिणीचे शिक्षण थांबले. धीरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतानाच २०१४ मध्ये झालेल्या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरीरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता उंच शिखरासारखी उंच स्वप्न बघत हे हिमशिखर दृढनिश्चयी व साहसी स्वप्न उराशी बाळगून होता. आपल्या दृढनिश्चयाने त्याने किलीमंजारो शिखर सर केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे.