- ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 20 - ट्रेनमधून खाली पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी ट्रेनला अर्धा किमी मागे नेण्यात आलं. आनंदराव मडकापूरे असं या तरुणाचं नाव असून वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आनंदराव मडकापूरे हा तरुण नरखेड-काचिगुडा इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत होता. अकोला रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.२0 वाजता ही ट्रेन निघाली होती. बार्शिटकळी-लोहगड दरम्यान तो ट्रेनमधून खाली पडला. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी ही गाडी अर्धा किमी मागे धावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आनंदराव मडकापूरे हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेडचा रहिवासी असल्याची माहिती रेल्वे पोलीस संतोष घोगे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्याच्यावर वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.