लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट बाजार समितीत भुईमुगाला हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पडेल भावात भुईमूग विक्रीस नकार दिल्याने बाजार समितीतील भुईमूग हर्रासी बंद पडली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोंडी केल्याने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळेंसह अकोट बाजार समितीत पोहोचले. या ठिकाणी त्यांनी आॅनलाइन यंत्रणा व प्रयोगशाळेची पाहणी केली. यावेळी राज्यातील शेतमालाच्या आॅनलाइन भावाचे फलक उद्यापर्यंत लावावे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर मालाची प्रतवारी काढून हर्रासी करण्यात यावी, असे निर्देश बाजार समिती सचिवांना दिले. अकोट येथे एका कार्यक्रमाकरिता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना भेटून भुईमूग खरेदीबाबत व्यापाऱ्यांनी केलेली कोंडी व पडेल भावाने होत असलेली खरेदी याबाबतची व्यथा मांडली. यावेळी पालकमंत्री शेतकऱ्यांसह बाजार समितीत पोहोचले. या ठिकाणी त्यांनी बाजार समिती सचिव राजकुमार माळवे यांना भुईमूग खरेदी व भावाबाबत विचारणा केली, तसेच जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून भुईमूग हर्रासीप्रकरणी चौकशी करावी व शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल याकरिता लक्ष द्यावे, असे निर्देश दिले. तसेच स्थानिक व्यापारी राज्याबाहेरील व्यापाऱ्यांना हर्रासीकरिता येऊ देत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी इतर बाजार समितीतील भुईमुगाचे हमीभाव जाणून घेतले असता अकोट बाजारामध्ये १५०० रुपयांची तफावत आढळून आली. त्यामुळे त्वरित बाजार समितीत आॅनलाइन भावाचे फलक दोन दिवसांत लावण्यात यावे व हर्रासीची वेळ ठरविण्यात यावी, असे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री यांच्यासोबत भाजपा तालुका संपर्क प्रमुख प्रवीण डिक्कर, बाजार समिती संचालक रामविलास अग्रवाल, सुनील गावंडे, अतुल म्हैसने, बाळासाहेब आवारे, डॉ. गजानन महल्ले, मोहन सावरकर, देवानंद डोबाळे, संदीप सावरकर, अनिल रावणकार, नीलेश नवघरे, धनंजय मानकर, पप्पू मोहोड, गोपाल भगत, चेतन मर्दाने, रामचंद्र गोतमारे, अर्जुन खाडे, मनोज रंदे, प्रवीण कराळे आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
अकोट बाजार समितीत पालकमंत्र्यांची धडक
By admin | Updated: May 25, 2017 01:31 IST