लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुलैपासून देशभरात जीएसटी कायदा लागू झाला; मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही पाहिजे त्या तुलनेत होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी जुनीच बिले दिली जात असल्याने जीएसटीचा प्रभाव सर्वसामान्य जनतेमध्ये जाणवत नाही. व्यापारी-उद्योजकांपुढे नेमक्या कोणत्या समस्या समोर येत आहेत, हे पडताळण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्यांची एक टीम सर्च मोहिमेसाठी बाजारपेठेत उतरली आहे. अकस्मात भेट देऊन जीएसटी अधिकाऱ्यांची टीम बाजारपेठेत फिरत असल्याने व्यापारी उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.जीएसटी कायदा लावला गेला असला, तरी अजूनही सॉफ्टवेअर अपडेटच्या अनेक समस्या व्यापारी-उद्योजकांना त्रस्त करीत आहेत. राज्य, राज्याबाहेरून आणि विदेशातून येणाऱ्या वस्तूंवर वेगवेगळा जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे ब्रॅण्डेड कंपनीकडून किती कर लावला जातो, याची प्रतीक्षा अकोल्यातील ट्रेडर्स करीत आहेत. करप्रणालीत घोळ असल्यामुळे अनेकांनी अजूनही जीएसटीचे सुधारित बिल ग्राहकांना दिले नाहीत. बिल देताना जीएसटीचा पेनाने उल्लेख करावा, असे आदेश अधिकाऱ्यांचे असतानाही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे अमरावती विभागात जीएसटी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सर्च मोहीम सुरू झाली आहे; मात्र या मोहिमेला सोशल मीडियावरून छापा संबोधिले जात असल्याने व्यापारी-उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अधिकारी ‘जीएसटी’ प्रणाली लागू करण्यासाठी तर व्यापारी सॉफ्टवेअर समजून घेण्यात गुंतले आहे. या दोघांमध्ये मात्र सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.--
जीएसटी अधिकाऱ्यांची ‘सर्च’ मोहीम
By admin | Updated: July 8, 2017 02:15 IST