सचिन राऊत / अकोलाशासनाने नियमावली ठरवून दिली, कायद्याचे बंधन घालून दिले तरी बाजारात गर्भपाताची औषधे बिनबोभाट मिळतात. फक्त त्यांसाठी मूळ किमतीच्या किमान दहापट रक्कम द्यावी लागते. सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवत गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा सुरूच केल्याची माहिती ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आली आहे. ३00 रुपयांची गर्भपाताची कीट तीन-चार हजार रुपयांना कुठल्याही अडथळ्याविना विकली जात असल्याचेही समोर आले आहे. गर्भपाताच्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याने अवैध गर्भपात मोठय़ा प्रमाणात वाढले होते. अशाच औषधांचा वापर करीत बिड जिल्ह्यातील गर्भपातासाठी कुख्यात डॉ. सुदाम मुंडे यांनी मुलींची गर्भातच हत्या केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले होते. त्यामुळे शासनाने गर्भपातासंबंधी औषधांच्या विक्रीसाठी ठोक औषध विक्रेता, किरकोळ औषध विक्रेता व डॉक्टरांसाठी नियमावली तयार केली होती. या नियमांच्या चौकटीतच गर्भपाताच्या औषधीची विक्री करण्याचे आदेश होते. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले असले तरी या विभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे गर्भपाताच्या औषधांची खुलेआम, नियमबाह्य विक्री जोरात सुरू असल्याचे ह्यलोकमतह्णने आज केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उजेडात आले आहे. गर्भपाताची औषध विक्री करताना डॉक्टरचे नाव, गाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, शासनमान्य गर्भपात केंद्र आहे किंवा नाही या बाबी नियमानुसार ठरविण्यात आल्या आहेत, तर रुग्णाचे नाव, गाव, पत्ता व इतर माहिती डॉक्टरने नोंदवून ठेवणे आवश्यक ठरते. हे सर्व रेकॉर्ड औषधी विक्रेत्यांनी ठेवणे बंधनकारक आहे. गर्भपाताच्या औषध विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याची कटकट असल्याने आणि नियमबाह्य विक्री करता येत नसल्याने या त्रिकुटाने विना देयकाने औषध आणणे आणि विना देयकानेच त्याची विक्री सुरु केल्याची माहिती लोकमतच्या हाती लागली. या माहितीवरून स्टिंग ऑपरेशन केले असता, गर्भपाताच्या औषधांची बेकायदा विक्री जोरात सुरू असल्याचे वास्तव समोर आले. याबाबत औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना माहिती आहे, मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यासंदर्भात अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा
By admin | Updated: November 29, 2014 01:11 IST