अकोला : गाव नमुना आठ-अ चा दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणार्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अटक केली. एका मंडळ अधिकार्यालाही एसीबीने दणका दिला. कंचनपूर येथील ग्रामसेवक शिवा महादेव गवई(३२) याने एका तक्रारदाराला घराबाबत गाव नमुना आठ-अ चा दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. त्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदविली. ग्रामसेवक गवई याने तक्रारकर्त्यास दोन हजार रुपये घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेमध्ये बोलाविले. या ठिकाणी एसीबीने सापळा रचला होता. तक्रारकर्ता दोन हजार रुपये घेऊन पतसंस्थेजवळ आला. त्याच्याकडून ही रक्कम ग्रामसेवक गवई याने घेताच दबा धरून बसलेल्या एसबीच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहात अटक केली. शिवा गवई याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यू. ए. जाधव, पोलिस निरीक्षक मनीष मोहोड यांनी केली.
दोन हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड
By admin | Updated: November 14, 2014 01:09 IST