अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शासन निर्णयानुसार रास्तभाव धान्य आणि केरोसीन दुकानांची प्रत्येक महिन्यात तपासणी करणे बंधनकारक असताना, जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून धान्य आणि केरोसीन दुकानांची तपासणीच करण्यात आली नाही. जिल्हा पुरवठा विभागांतर्गत अधिकार्यांनी या कामाकडे कानाडोळा केल्याने, रास्तभाव धान्याची दुकाने आणि परवानाधारक केरोसीन दुकानांची तपासणी रखडली आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणारे धान्य तसेच केरोसीन परवानाधारक दुकानांमधून केरोसीन वितरण योग्यरित्या होते की नाही, यासंदर्भात शासन निर्णयानुसार पुरवठा विभागांतर्गत निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांमार्फत प्रत्येक महिन्यात प्रत्येकी किमान दहा रास्तभाव धान्य दुकाने आणि केरोसीनच्या दहा दुकानांची तपासणी करणे बंधनकारक आहे. अकोला जिल्ह्यात रास्तभाव धान्याची १ हजार ५२ दुकाने असून, १ हजार २७३ घाऊक-अर्धघाऊक परवानाधारकांसह किरकोळ केरोसीन विक्रेते आणि हॉकर्स आहेत; मात्र गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील रास्त भावाच्या धान्य आणि परवानाधारक केरोसीन विक्रीच्या दुकानांची तपासणी पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांकडून करण्यात आली नाही. पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी कानाडोळा केल्याच्या स्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या आणि परवानाधारक केरोसीन दुकानांच्या तपासणीचे काम रखडले आहे.
** जिल्ह्यात अशी आहेत रास्तभाव धान्य, केरोसीनची दुकाने!-रास्तभाव धान्य दुकाने - १०५२-घाऊक केरोसीन परवानाधारक - १३-अर्धघाऊक केरोसीन परवानाधारक - १५-किरकोळ केरोसीन विक्रेते - ११३०-परवानाधारक केरोसीन हॉकर्स - ११५ एकूण - २३२५