अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे केले.विदर्भ चेंबर आॅफ कामर्स इंडस्ट्रिजच्या मराठा मंडळ सभागृहात आयोजित ८४ व्या वार्षिक आमसभेला उपस्थित राहण्यासाठी शाहनवाज हुसेन येथे आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पानपालिया होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी खासदार अजय संचेती, महापौर विजय अग्रवाल, राजकुमार बिलाला, निकेश गुप्ता, अशोक डालमिया, वसंत बाछुक आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना हुसेन यांनी व्यापारी, उद्योजकांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यावर सरकारचा भर असून, जीएसटीबाबत ई-वे बिलांची ५० हजार रुपयांची मर्यादा आता एक लाख रुपये करण्यात येण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. या राज्यातील व्यापारी, उद्योजकांच्या समस्या आपण सरकारपुढे मांडणार असल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलासह त्यांनी स्थानिक औद्योगिक वसाहतीला कायमस्वरू पी पाणी पुुरवठा होण्यासाठी अमृत योजनेतून हा प्रश्न सोडविण्यासाठीची उद्योजकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच अकोल्याच्या विमानतळाचा विस्तार होण्यासाठी आपले खास प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी दिल्लीहून जेवढा वेळ अकोल्याला येण्यासाठी लागला, तेवढ्या वेळेत मी विमानाने इंग्लंडला पोहोचलो असतो, असे म्हणताच सभागृहात प्रचंड हशा पिकला. या विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करून, ते सुरू करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यापारी, उद्योजक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असतो, तो याहीवेळी उभा राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सभेला चेंबरचे पदाधिकारी नितीन खंडेलवाल, कासमअली नानजीभाई, विवेक डालमिया, निरजंन अग्रवाल, रवी खंडेलवाल, रमाकांत खेतान, श्रीकर सोमण, शशिकांत खेतान, सुधीर राठी, ओमप्रकाश गोयनका, प्रकाशभय्या, प्रभाकर गावंडे, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, गोविंद बजाज, राहुल गोसर, राहुल गोयनका, निरव वोरा, दिलीप खत्री, कृष्णकुमार राठी, सतीश बालचंदाणी, गोपाल अग्रवाल, कृष्णा शर्मा, किशोर बाछुका, प्रमोद खंडेलवाल, आशिष चंदराणा, रूपेश राठी, अॅड. सुभाषसिंग ठाकूर, निखिल अग्रवाल, नितीन पाटील, कुंजबिहारी जाजू, पंकज बियाणी यांच्यासह चेंबरशी निगडित व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.