इन्कम टॅक्स चौकात कारवाईचा ‘गजराज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:26 AM2017-10-30T01:26:24+5:302017-10-30T01:29:53+5:30
अकोला : गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणात अडसर ठरणारा बॉटल नेक दूर करण्यासाठी रविवारी इन्कम टॅक्स चौकात महापालिकेचा गजराज चालला. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत मार्गाच्या दोन्हीकडील प्रतिष्ठाने, आवार भिंती जमीनदोस्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणात अडसर ठरणारा बॉटल नेक दूर करण्यासाठी रविवारी इन्कम टॅक्स चौकात महापालिकेचा गजराज चालला. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत मार्गाच्या दोन्हीकडील प्रतिष्ठाने, आवार भिंती जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या या कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात मार्गावर कठडे लावून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. दरम्यान, वैभव हॉटेल, सुनील सुपर शॉपी आणि दिलीप चौधरी यांना त्यांच्या इमारतींचे बांधकाम काढून घेण्यासाठी वेळ दिला आहे.
गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणास अडसर ठरत असलेला बॉटल नेक दूर करण्यासाठी या मार्गावर महापालिकेने शनिवारपासूनच कारवाई सुरू केली. त्यामुळे बॉटल नेकमध्ये अडसर ठरत असलेल्या व्यावसायिकांमध्ये कालपासून धडकी भरलेली होती. रविवारी सकाळपासूनच कारवाई सुरू झाली. या मार्गावरील एका विधिज्ञांच्या बंगल्याचा पोर्च सकाळी पाडण्यात आला. त्यानंतर मुक्ता प्लाझातील लूट प्रतिष्ठानचे संचालक आणि आयुक्तांमध्ये येथे शाब्दिक चकमक झाली. वारंवार सूचना देऊनही आपण बांधकाम तोडत नसाल, तर या कारवाई शिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे आयुक्तांनी चारचौघांत व्यावसायिकांना सुनाविले. माजी मंत्री प्रा.अझहर हुसेन यांच्या मालकीच्या कान्व्हेंटची आवारभिंत पाडली गेली. यामार्गावरील झेरॉक्स सेंटर, बालाजी फ्रुट, काळपांडे ज्वेलर्स, जनता टेन्ट हाउस, ड्रेसिंग ऑप्टिकल्स यांच्या मालकीचे तीन प्रतिष्ठान, पाराशर मार्केटची आवारभिंत, एसबीआयची आवारभिंत, आयडीबीआयलगतच्या चार व्यावसायिकांचे प्रतिष्ठान, बालाजी, शर्मा स्टिल, विठ्ठल मोबाइल शॉपीचे अडसर ठरत असलेले बांधकाम गजराजने पाडण्यात आले. सुनील सुपर शॉपीचे संचालक बोराखडे यांनी बांधकाम स्वत: पाडून घेण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. वैभव हॉटेलचे संचालक आणि बिल्डर दिलीप चौधरी यांनी न्यायालयीन स्थगनादेश आणला असल्याने महापालिकेने दोन्ही इमारतींना हात लावला नाही.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मार्ग रुंदीकरणाच्या मोहिमेत अडचण येऊ नये आणि वाहतूक विस्कळीत पडू नये म्हणून मनपा आयुक्तांनी इन्कम टॅक्स चौकात आणि सुनील सुपर शॉपीजवळ लोखंडी कठडे लावून ही वाहतूक पारसकर मोटारसायकल शो रूमकडून रविवारी वळविली होती. दरम्यान, दोन्ही बाजूला ट्रॅफिक आणि साधे पोलीस मोठय़ा प्रमाणात येथे बंदोबस्तासाठी होते.
मनपा अधिकार्यांवरही हवी कारवाई
गोरक्षण मार्गावरील इमारतीचा नकाशा एकदा नव्हे, दोनदा मंजूर करून देण्यात आला. ही मंजुरी महापालिकेच्या तत्कालीन अधिकार्यांनीच दिली. अशा जबाबदार अधिकार्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, व्यापार्यांनी लक्षावधी देऊन प्रतिष्ठाने घेतलीत. त्याची भरपाई कोण करणार, त्यांना न्याय कोण देणार, असे अनेक प्रश्न या कारवाईनिमित्त येथे उपस्थित करण्यात आलेत.
- सकाळी सुरू झालेली मार्ग रुंदीकरणाची मोहीम सायंकाळीदेखील सुरूच होती. बळवंत मेडिकल्स, डॉ. कुचर, प्रजापती, रघुवंशी, अनुराधा डेली नीड्सचे बांधकाम पाडण्याचे काम सायंकाळी सुरू होते. सोमवारी महापालिकेची यंत्रणा आता लक्ष्मी टेडर्सकडे सरकणार आहे. महापालिकेच्या गजराजमुळे बिल्डिंगचे नुकसान होऊ नये म्हणून आता स्वयंस्फूर्तीने लोकांनी बांधकाम काढण्यास सुरुवात केली आहे.
गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणासाठी दोन विद्यमान लोकप्रतिनिधी आणि दोन माजी मंत्र्यांच्या कुटुंबीयांनीदेखील सहकार्य केले आहे. वैभव हॉटेल व दिलीप चौधरी यांच्याकडे स्थगनादेश असला, तरी या इमारतींची परवानगी अनधिकृत आहे. त्यांनी मार्ग रुंदीकरणाच्या कार्यात महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा मनपालादेखील न्यायालयात दुसरी बाजू मांडून मार्ग काढावा लागेल.
-अजय लहाने,
मनपा आयुक्त अकोला.