मुंडगाव (जि. अकोला): अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते राजेश दिगंबरराव खोकले यांच्या कल्पकतेतून व संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने संस्थानच्या मंदिरालगत अंगणात सिमेंटच्या फ्लोअरिंगवर १३00 चौरस फूट क्षेत्रफळात ऑइल पेंटने जगाचा नकाशा एक वर्षापूर्वी काढण्यात आला होता. सदर नकाशाची दखल भारतातील सर्वांत मोठा नकाशा म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्डने २७ मार्च रोजी घेतली. त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांनी १ एप्रिल रोजी संस्थानला प्रदान केले आहे. मुंडगावच्या गजानन महाराज पादुका संस्थानने पंचक्रोशीतील विद्यार्थी, स्पर्धात्मक परीक्षेच्या उमेदवारांचे व लहान-मोठय़ा नागरिकांचे भौगोलिक ज्ञान वाढविण्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी सदर नकाशा रेखाटण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तो रेखाटण्यात आला. त्याच्या भव्यतेमुळे व अचूकतेमुळे तो लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. सदर नकाशा रेखाटण्याकरिता गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष विजय ढोरे, उपाध्यक्ष महेश गाढे, विश्वस्त विलास बहादुरे, गणेश ढोले, शरद सोनटक्के ,ज्वारसिंग आसोले, गणेश कळसकर व डॉ. प्रवीण काळे यांनी बरेच परिश्रम घेतले. नकाशाची आखणी संजय बोरकर, आनंदा सोनोने यांनी केली. त्याच्या रंगरंगोटीकरिता सुनील नांगोलकर, मयूर फुसे, अरविंद येवतकार, रवींद्र पाठक, गोपाल भडंग यांनी मदत केली तसेच बिपीन नावकर, मिलिंद शेलकर, पाचकोर , बहादुरे गुरुजी यांच्यासह अनेकांनी नकाशाच्या गुणवत्तेकरिता व गिरीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
गजानन महाराज पादुका संस्थानची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By admin | Updated: April 3, 2015 02:31 IST