अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा मोफत धान्य वाटपासाठी शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना डिसेंबर अखेरपर्यंत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत गहू व तांदूळ इत्यादी धान्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यानंतर जुलै ते नोव्हेंबर अखेरपर्यंत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरणाचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला होता. मोफत धान्य वितरणाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आल्याने, प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना डिसेंबर महिनाअखेर मोफत धान्य वाटप करण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याच्या सूचना शासनाच्या पुरवठा विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला ९ डिसेंबर रोजी प्राप्त झाल्या, त्यानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून गहू व तांदूळ इत्यादी धान्यांचा मोफत लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्याचे वितरण करण्यास डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याच्या सूचना शासनाच्या पुरवठा विभागामार्फत प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना डिसेंबर अखेरपर्यंत मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी