अकोला : बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करून पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी केशवनगर रिंग रोडस्थित एमराल्ड हाइट्स स्कूलच्या मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध शुक्रवारी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शाळेची मान्यता स्टेट बोर्डची असतानाही ती सीबीएससी बोर्डाची असल्याचे संस्थेतर्फे भासविण्यात येत असल्याची तक्रार अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिरी श्याम राऊत यांनी खदान पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने केशव नगरातील एमराल्ड हाइट्स स्कूलची प्राथमिक चौकशी केली होती. या संदर्भात आमदार नितीन देशमुख व पालकमंत्री बच्चू कडू यांनीदेखील तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. समितीने प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शुक्रवारी एमराल्ड हाइट्स स्कूलच्या मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध भादंवि कलम ४२० व ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
काय म्हटले आहे तक्रारीत
- शासन निर्णयानुसार, इयत्ता पहिली व दुसरीसाठी आॅनलाइन वर्ग घेता येत नाहीत; मात्र तरीही हे वर्ग आॅनलाइन घेण्यात आले.
- इयत्ता तिसरी ते आठवीचे आॅनलाइन वर्ग नियोजित वेळेपेक्षा जास्त सुरू होते. असे करणे हे शासन नियमांचे उल्लंघन आहे.
- शिक्षक-पालक संघ कार्यकारी समितीची स्थापन झाली नाही.
अशी केली फसवणूककेशवनगर, रिंग रोडस्थित एमराल्ड हाइट्स स्कूलला स्टेट बोर्डाची मान्यता असतानाही शाळा सीबीएससी असल्याचे भासवून पालकांची दिशाभूल करून, त्यानुसार शुल्क आकारण्यात आले. शिवाय शाळेतूनच सीबीएससी पॅटर्नवर आधारित खासगी पुस्तके, शाळेचा लोगो असलेल्या वह्या व गणवेशाची विक्री केली जाते.