अकोला - स्वाइन फ्लू आजारावर अकोला येथे उपचार घेत असलेल्या आणखी चार रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, आणखी चार जणांना स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालय व खासगी रुग्णालयात अकोला, वाशिम व बुलडाणा येथील ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील चार रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला असून, चार जणांवर संशयित म्हणून उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोडवरील रहिवासी परी उमेश पाटील (३), भास्कर विठोबा पोखरे (३९) रा. गणेशपूर खामगाव, प्रशांत गोपाल शेळके (३२) रा. तुकाराम चौक, रिना दीपक ठाकरे (३२), जिल्हा परिषद कॉलनी खडकी यांचा समावेश आहे. या सोबतच आलीया परवीन शेख अजीज (४) रा. साईनगर अकोला, गौरव विठ्ठल माळी (२३) अकोला, जिजा विठोबा खडसे (४५) रा. खडकी रिसोड, प्रभावती श्रीराम राहिते (४0) रा. रिठद-रिहार रिसोड यांच्यावर स्वाइन फ्लू संशयित म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालय व खासगी रुग्णालयातात उपचार सुरु आहेत. स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, वातावरणातील गारवाही स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक झाला आहे. या वातावरणामुळे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत असून, आरोग्य विभागाने आणखी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञ डॉ क्टरांनी व्यक्त केले आहे. २८ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्यास स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी ते अत्यंत पोषक असून, या वातावरणात हे विषाणू तब्बल २४ तासापर्यंत जिवंत राहत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ३0 डिग्री अंश सेल्सिअसच्यावर तापमान गेल्यास या विषाणूंचा तत्काळ नायनाट होण्यास मदत होते; मात्र हवेत प्रचंड गारवा असल्याने आणि तापमान २८ डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली आल्यामुळे हे स्वाइन फ्लूचे विषाणू पसरण्यास मदत होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
अकोला येथे स्वाइन फ्लूचे आणखी चार रुग्ण पॉझिटीव्ह
By admin | Updated: March 14, 2015 01:38 IST