अकोला: फोर-जीचे खोदकाम करणार्या कंपनीची मुदत संपल्यावरही मनमानीरीत्या खोदकाम सुरू असून, जलवाहिन्यांची प्रचंड नासाडी होत असल्याचा मुद्दा शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके यांनी उपस्थित केला. या मुद्यावर ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, सुनील मेश्राम यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. कंपनीचे काम बंद करण्याचे निर्देश देण्याची मागणी महापौरांकडे केली असता, महापौरांनी त्याला मंजुरी दिली. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेला सुरुवात होताच शहरात खोदकाम करणार्या मोबाइल कंपन्यांचा मुद्दा उपस्थित झाला. कंपनीची खोदकामाची मुदत संपल्यानंतरदेखील विविध ठिकाणी खोदकाम केले जात आहे. रात्री खोदकाम करताना जलवाहिन्यांची प्रचंड नासाडी होत असून, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विजय अग्रवाल यांनी केला. मुदत संपल्यावरही खोदकाम होत असून, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांनी खुलासा करावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. मुदतीच्या संदर्भात आयुक्तांना अवगत करून दिल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता मनोहर यांनी दिल्यानंतर आयुक्तांनी मात्र मुदतीबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत हात वर केले. नगरसेवकांचा गोंधळ, संतप्त झालेले विजय अग्रवाल, सत्तापक्षावर टीका करणारे विरोधी पक्षनेता साजीद खान तसेच आयुक्त व मनोहर यांच्यामधील युक्तिवाद पाहता सभागृहात अक्षरश: तमाशा रंगल्याचे चित्र दिसून आले. फोर-जीचे खोदकाम त्वरित बंद करण्याची मागणी अग्रवाल यांच्यासह उपमहापौर विनोद मापारी, नगरसेवक आशिष पवित्रकार, बाळ टाले, अजय शर्मा, राहुल देशमुख, पंकज गावंडे, राजेश्वरी शर्मा, मंजूषा शेळके, धनश्री देव यांनी रेटून धरल्यानंतर अखेर महापौरांनी काम बंद करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले.
फोर-जी अन् बाजार वसुलीच्या मुद्यावर घमासान
By admin | Updated: April 16, 2015 01:38 IST