जलंब : आमसरी शिवारातील दारुचे गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी १३ लाख ४२ हजार ७१९ रुपयांची दारु चोरुन नेल्याची घटना ११ मे रोजीचे रात्री घडली होती. या घटनेतील आरोपींना पकडण्यात तसेच चोरीचा ऐवज जप्त करण्यास पोलिसांना काल १३ मेच्या रात्री यश मिळाले आहे. या आरोपींना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नांदुरा येथील मुकेश रामचंदानी यांचे विदेशी दारु व बिअर ठेवण्यासाठी आमसरी शिवारात गोडावून आहे. ११ मे रोजी ११.३0 वाजताचे सुमारास मुकेश रामचंदानी हे गोडावूनवर गेले असता त्यांना दारु ठेवलेल्या गोडावूनच्या खिडकीची ग्रिल तुटलेली दिसली. त्यामुळे त्यांनी गोडावूनची पाहणी केली असता विदेशी दारु किंमत १३ लाख ४२ हजार ७१९ रु.चा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले. यानंतर पो.स्टे. जलंब येथे ११ मे रोजी यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन जलंब पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना १२ मे रोजी रात्री २ वा. सुमारास पो.स्टे. पांगरी ता. बाश्री जि. सोलापूर येथे या घटनेतील आरोपी चोरीचा दारुचा माल एम.एच. २५ पी. ३१९६ या वाहनाद्वारे घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी अडविले असता वाहनात आमसरी येथून लंपास केलेला दारुसाठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी माल जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले. या चोरीप्रकरणातील आरोपी अनिल ऊर्फ बल्या शाहु पवार (वय २१) रा.दत्तनगर उस्मानाबाद, भारत रावसाहेब पवार (वय २२) रा.दत्तनगर उस्मानाबाद, संगीता ऊर्फ कविता दत्ता शिंदे (वय २५) रा.मांडवा ता.वाशी ह.मु.तुळजापूर रोड उस्मानाबाद या चार आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींना १३ मे रोजी पो.स्टे. जलंब येथे आणून अटक केल्यानंतर त्यांना शेगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता या चारही आरोपींना १९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विदेशी दारु चोरट्यांना अटक
By admin | Updated: May 14, 2014 23:57 IST