आकोट (अकोला) : तरुण मुलाच्या मृत्यूचा विरह कोणत्याही मातेसाठी असह्यच असतो; मात्र दु:खाने खचून न जाता मतदानाचे कर्तव्य पार पाडणार्या आकोट येथील एका मातेला लोकशाहीनेही बुधवारी सलाम ठोकला.आकोट येथील लक्ष्मण छोटूलाल कहार याचा वयाच्या २८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्याला कर्करोगाने ग्रासले होते. मंगळवारी रात्री त्याला मृत्यूने कवटाळले. दोन मुलंही आहेत. लक्ष्मणच्या मृत्यूने कुटुंबियांवर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला; मात्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असल्याची जाणीव कहार कुटुंबियांना होती. मुलाच्या मृत्यूचे दु:ख आयुष्यासाठी आहे; पण मतदानाचं कर्तव्य पाच वर्षातून एकदाच पार पाडावे लागते. मुलाचा अंत्यविधी दुपारच्या वेळी ठेवला असता, तर आप्तेष्टांच्याही मतदानात अडथळा येईल, याचीही जाणीव कहार कुटुंबियास होती. त्यामुळे त्यांनी अंत्यविधी सकाळी १0 वाजताच आटोपून घेतले. अंत्यविधी आटोपल्यानंतर लक्ष्मणचे चार भाऊ हिंमत, अशोक, राम आणि राजेश यांच्यासह त्यांच्या आईनेही मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी कहार कुटुंबियांनी उचललेले पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे.
सकाळी मुलाला अग्नी, दुपारी मतदान!
By admin | Updated: October 16, 2014 00:17 IST