संतोष येलकर/अकोला : जनसुविधा योजना अंतर्गत जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतस्तरावर स्मशानभूमींची विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २0 कोटी १२ लाखांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत सादर करण्यात आला; मात्र मागणीच्या तुलनेत मार्चअखेर केवळ ७0 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाला आहे. वारंवार निधी मागणीचा प्रस्ताव सादर करूनही उर्वरित १९ कोटी ४२ लाखांचा निधी अद्याप मिळाला नसल्याने, जिल्ह्यातील जनसुविधांच्या कामांसाठी निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. जनसुविधा योजना २0१४-१५ अंतर्गत जिल्ह्यातील ४0 मोठय़ा आणि ३५५ लहान अशा एकूण ३९५ ग्रामपंचायतींमार्फत स्मशानभूमी विकास, स्मशानभूमी शेड, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, कुंपण, पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत २0 कोटी १२ लाखांच्या निधीची मागणी जिल्हा परिषदमार्फत १२ सप्टेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे करण्यात आली. त्यामध्ये ४0 मोठय़ा ग्रामपंचायतींसाठी २ कोटी ३५ लाख आणि ३५५ लहान ग्रामपंचायतींसाठी १७ कोटी ७७ लाखांच्या निधीचा समावेश आहे. निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुन्हा ११ फेब्रुवारी २0१५ रोजी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला; परंतु निधी मागणीच्या तुलनेत गत मार्चअखेर मोठय़ा ग्रामपंचायतींसाठी ५0 लाख आणि लहान ग्रामपंचायतींसाठी २0 लाख असा एकूण केवळ ७0 लाखांचा निधी जिल्हा नियोजन विभागामार्फत जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला. उर्वरित १९ कोटी ४२ लाखांचा निधी अद्याप जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेला नाही. मागणीच्या तुलनेत अत्यल्प निधी मिळाला असल्याने जिल्ह्यातील जनसुविधांच्या कामांसाठी जिल्हा परिषदेची मान्यता आणि ग्रामपंचायतींना निधी वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जनसुविधा अंतर्गत कामांसाठी निधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबत प्रतीक्षा करण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे.
‘जनसुविधा’च्या कामांसाठी मिळेना निधी
By admin | Updated: May 19, 2015 01:24 IST