नासीर शेख
खेट्री : २२ महिन्यांपासून रखडलेल्या पिंपळखुटा वाहळा मार्गावरील पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. कागदाेपत्री भूमिपूजन करून काम थांबल्याचा आराेपी परिसरातील नागरिकांनी केला हाेता. याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये ६ डिसेंबर राेजी प्रकाशित केले हाेते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आता पुलाच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अकोला-बुलडाणा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले पिंपळखुटा वाहळा मार्गावरील पिंपळखुटा जवळील नदीवरील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुलाचे २०२०च्या ९ फेब्रुवारी रोजी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली माजी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. तेव्हापासून पुलाचे बांधकाम बंद हाेते. पुलाअभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत हाेता. या समस्येचा लाेकमतने सातत्याने पाठपुरावा केला. कंत्राटदाराने नदीत खड्डे खाेदून काम अर्धवट साेडले हाेते. २२ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पुलाच्या कामाला सुरुवात केली नव्हती. या पुलाचे काम रखडल्याने पिंपळखुटा, चान्नी, शिरपूर, चांगेफळ, उमरा, पांगरा, आडगाव आदी गावांतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीतून ये-जा करावी लागत आहे. नदीमध्ये पाणी व मोठमोठे दगड असल्याने पिंपळखुटा, गावात एसटी बस, दुचाकी, चारचाकी व इतर कोणतेही वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करून ये-जा करावी लागत आहे. भूमिपूजन केल्यानंतर कामासाठी खोदलेले खड्डे धोकादायक ठरत आहे. कंत्राटदारांचे खड्डे खोदले ते धोकादायक ठरत असून, अनेक वेळा लहान मुले व शेतकऱ्यांची जनावरे या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
...........................
२५ गावांना मिळणार दिलासा
खामगाव येथे मोठी बाजारपेठ असल्याने पिंपळखुटा परिसरात जवळपास २५ ते ३० गावांना शेतमाल विक्री किंवा इतर कामासाठी खामगावजवळ आहे. त्यामुळे पुलाचे काम झाल्यावर या परिसरात २५ ते ३० गावांना दिलासा मिळणार आहे.