लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समितीने या जागेचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. आता हे महाविद्यालय वाशिम रोडवर होणार आहे. यासंदर्भात लोकमतने पाठपुरावा केला होता हे विशेष.अकोला येथे राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला पाच कोेटी रुपये निधी दिला आहे. महाविद्यालयाला व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार जागा हवी आहे; पण दोन वर्षांपासून जागाच उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. त्यामुळे या महाविद्यालयासाठी मिळालेला निधी परत जाण्याची वेळ आली होती. या पृष्ठभूमीवर आमदार गोपीकिशन बाजोरिया अध्यक्ष असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समितीने यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी या समितीची सभा कृषी विद्यापीठात बोलावली होती. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार बाजोरिया यांच्यासह कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद व या समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, गोपी ठाकरे व नितीन हिवसे यांची उपस्थिती होती. या बैठकीत कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवर असलेली जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदल्यात महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठ त्यांच्याकडे असलेली तेवढीच जागा विद्यापीठाला देणार आहे. या निर्णयामुळे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या जागेवर प्रशस्त महाविद्यालय होणार आहे. येथे बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६० विद्यार्थी प्रवेश घेतील. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षाचा असल्याने ३०० विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२० विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत.दरम्यान, शहरातील सरकारी बगीचा येथेही माळी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.सूपिकजमिनीचा ताबा वाशिम रोडवरील क्षेत्रावर कृषी विद्यापीठाचे संशोधन चालते. येथे पाणी भरपूर आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने गुडधी येथील जागेचा प्रस्ताव ठेवला होता; पण समितीने याच जागेचा निर्णय घेतल्याने त्याचा संशोधनवर परिणाम होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
अखेर पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या जागेचा मार्ग मोकळा!
By admin | Updated: May 27, 2017 00:05 IST