अकोला: मोफत सायकल वाटप योजनेंतर्गत अखेर जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांची लाभार्थी यादी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची बुधवारी तहकूब करण्यात आलेली सभा गुरुवारी घेण्यात आली. जिल्हा परिषदमार्फत १० लाख रुपयांच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या मोफत सायकल वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५० लाभार्थी विद्यार्थ्यांच्या यादीला या सभेत मंजुरी देण्यात आली. लाभार्थी यादीत बाळापूर तालुक्यातील अर्ज केलेल्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याच्या मुद्यावर बुधवारी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे अर्ज केलेल्या संबंधित दहा लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे का समाविष्ट करण्यात आली नव्हती, यासंदर्भात माहिती घेऊन दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामार्फत पातूर तालुक्यात माध्यमिक शाळांना एलइडी टीव्ही संच वाटप करण्यात आले; मात्र टीव्ही वाटपासाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या मागील सभेत देण्यात आले होते. त्यानुषंगाने याबाबत काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा सभेत करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिक्षण सभापती प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.