लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी (सोमवार) सकाळी पक्ष प्रमुखांचे शहरात आगमन होत असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, ही शिवसेनेची ओळख आहे. असे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी सांगितले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानची सुरुवात मराठवाड्यात केली. त्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील २० विधानसभा मतदारसंघात जाऊन शिवसेनेचे नेते, आमदार, नगरसेवक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या समस्या आणि उपाय याचा समावेश असलेला इत्थंभूत आढावा पक्ष प्रमुखांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती खा. सावंत यांनी यावेळी दिली. त्या पृष्ठभूमीवर रविवारी सकाळी तीनही जिल्ह्यांमध्ये सेना नेते, आमदार दाखल झाले असून, अकोल्यात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार, नगरसेवकांच्या चमूने त्या-त्या मतदारसंघात जाऊन शिवसंपर्क अभियानास सुरुवात केली आहे. उद्या (सोमवार) सकाळी १०.३० वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शहरात आगमन होणार असून, स्थानिक विश्रामगृह येथे तीनही जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषदेत भूमिका विशद करून पक्ष प्रमुख मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती खा. सावंत यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार!
By admin | Updated: May 15, 2017 02:00 IST