धाड : सतत दुष्काळी स्थिती डोक्यावर कर्ज या विवंचनेत वावरणा-या ग्राम पांगरखेड (ता.जि.बुलडाणा) या गावातील शेतक-याने आपल्या घरासमोरील असलेल्या पाण्याचे टाक्यात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ४ वाजता सुमारास उघडकीस आली.
बुलडाणा तालुक्यातील धाड पासून ५ कि.मी.अंतरावरील पांगरखेड गाव आहे. येथील शेतकरी उत्तम श्रीरंग पिंपळे वय ५८ हे १७ एप्रिल पासून आपल्या घरातून बेपत्ता झाले. त्यांचा त्यांचे नातलगांनी शोधाशोध घेतला असता ते सापडले नाही. अखेर नातेवाईकांनी शेतकरी असणारे पिंपळे घरुन बेपत्ता असल्याची माहिती नातलगांनी सोमवारी धाड पोलिसांत दिली.
दरम्यान मंगळवार १९ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता सुमारास दगडूबा बाबुराव पिंपळे यांना सदर शेतकºयाचा मृतदेह घरासमोरच्या पाण्याच्या टाक्यात तरंगतांना दिसला याप्रकरणी धाड पोलिस ठाण्याचे पीएसआय गजानन मुंडे, पोहेकाँ माधव कुटे, तांबेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन प्रेताची उत्तरीय तपासणी घटनास्थळी करण्यात आली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
उत्तमराव पिंपळे ह्यांचे नावावर नऊ एकर शेती असून ती कोरडवाहू आहे. तर भारतीय स्टेट बँकेचे त्यांचे नावावर घराच्या बांधकाम, पीककर्ज, ट्रॅक्टर कर्ज असे मिळून सहा लाखाचे कर्ज असल्याचे समजते. कर्ज आणि शेतातील नापिकी ह्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी उत्तम पिंपळे ह्यांनी आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. (वार्ताहर)