शिर्ला (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. बाळू सदाशिव वानखडे (४८) असे या शेतकर्याचे नाव असून, त्यांनी ३ नोव्हेंबरला विष प्राशन केले होते. अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू वानखडे यांच्याकडे ३ एकर शेत असून, त्यांच्या डोक्यावर बँक, सावकार व उधार-उसणवारी असे लाखाचेवर कर्ज होते. यावर्षी सोयाबीन पिकाने दगा दिल्यामुळे वर्षभराचा खर्च कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या वानखडे यांनी अखेर जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. दरम्यान, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी बाळू वानखडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नांदखेड येथील शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: November 10, 2014 01:44 IST