जी श्रीधर २४ तास ऑन ड्युटी
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा कुटुंबीयांना वेळ कमीच मिळतो, त्यांच्या पत्नी लावण्या जी. श्रीधर यांनी दिली माहिती. बरेच वेळा कौटुंबिक कार्यक्रमालाही ''ते'' उपस्थित नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली; मात्र यापेक्षा मोठे कर्तव्य असल्याचे त्या मोठ्या गर्वाने सांगतात.
अकोला : प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना स्वतःच्या कुटुंबीयांपेक्षाही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, महिला, मुली, युवतींच्या सुरक्षेची जबाबदारी एक कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यावर आहे. त्यामुळे स्वतःची पत्नी मुले व आई-वडिलांना वेळ देता येईल याची शाश्वती नाही; मात्र जिल्ह्यात रहिवासी असलेल्या माझ्या कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक जी. श्रीधर करीत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी लावण्या जी. श्रीधर यांनी लोकमतसोबत केलेल्या खास बातचितमध्ये दिली. एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची पत्नी होण्याचा जेवढा मोठा बहुमान आहे. तेवढाच त्यागही एका अधिकाऱ्याची पत्नी मुलांना व आई-वडिलांना करावा लागतो. कुठली घटना केव्हा घडेल आणि महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमातून त्यांना केव्हा घरातून बाहेर पडावे लागेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे त्यांच्या कामात हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही कुटुंबीय म्हणून करीत आहोत. जी. श्रीधर यांनी आम्हाला वेळ द्यावा अशी खूप इच्छा मनात असते. मात्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेळ देऊन त्यांच्या समस्या त्यांच्यावर होत असलेले अत्याचार याविरुद्ध रात्रंदिवस काम करणे हे आम्हाला वेळ देण्यापेक्षा केव्हाही मोठे कर्तव्य आहे आणि हीच बाब आमच्या कुटुंबीयांसाठी भूषणावह आहे. प्रत्येक मुलीला सुरक्षित करण्याची जबाबदारी माझे पती जी. श्रीधर करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कार्य माझ्यासह जिल्ह्यातील प्रत्येक पुरुषासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कुटुंबीयांना वेळ दिला का किंवा नाही दिला का याची खंत मनात असते मात्र वेळ नाही मिळाला तरीही आता आम्ही त्यांच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतो. कारण त्यांच्यावर असलेली जबाबदारी आम्ही कुटुंबीय सध्या समजू शकतो, अशी माहिती लावण्या श्रीधर यांनी दिली.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेच नाहीत - लावन्या जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पत्नी लावण्या जी. श्रीधर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र जिल्ह्यात मोठी घटना घडल्याने जी. श्रीधर हे दुपारपासून तर रात्री उशिरापर्यंत त्या घटनेच्या तपासासाठी बाहेर होते. त्यामुळे सर्व नातेवाइकांना कुटुंबीयांना बोलावून उत्साहात साजरा करण्याचा वाढदिवस कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आलेच नाहीत. असा त्यागही बरेच वेळा करावा लागत असल्याची माहिती लावण्या जी. श्रीधर यांनी दिली.
क्वारंटाईनमुळे वेळ मिळाला - जी. श्रीधर
कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. आम्ही रात्रंदिवस खबरदारी घेत आहोत; मात्र मला व कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी कोरोनाने घेरले. त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय क्वारंटाइन आहोत. याच कारणामुळे आता कुटुंबीयांसाठी काही वेळ देता येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गमतीने दिली. रविवारी वेळ देण्याचा प्रयत्न करतो, मात्र मीटिंग किंवा काही घटनेमुळे तेही शक्य होत नाही. तसेच दररोज सायंकाळी एक ते दोन तास मुलांना व पत्नीला वेळ देण्याचा प्रयत्न असतो; मात्र फोन कॉल सुरू असल्याने त्यातही व्यत्यय येतो.