अकोला: पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्याच्या मुद्यावरून महापालिका कर्मचार्यांनी सोमवारी सकाळी पुकारलेला संप सायंकाळी ७ वाजता मागे घेतला. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत आयुक्त सोमनाथ शेटे यांनी थकीत रक्कम अदा करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी संघर्ष समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. थकीत वेतनासह पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम, सेवानवृत्त वेतन नियमित करणे, उपदानाची रक्कम तसेच अनुकंपा नियुक्तीच्या मुद्यावर मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या शिष्टाईने २८ जानेवारी रोजी संप मिटला. प्रशासनाने तीन महिन्यांचे थकीत वेतन अदा केल्यानंतर उर्वरित मागण्यांची आजपर्यंतही पूर्तता केली नसल्याने प्रशासनाने कराराचा भंग केल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने १ मार्चपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा मनपा आयुक्तांना दिला होता. त्यानुसार संघर्ष समितीने कामबंद आंदोलन सुरू केले. सकाळी सुरू झालेला संप मिटवण्यासाठी पुन्हा एकदा आ.गोपीकिशन बाजोरिया धावून आले. सायंकाळी आ.बाजोरिया यांच्या दालनात आयोजित बैठकीत मनपा आयुक्त सोमनाथ शेटे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम, विरोधी पक्षनेता साजीद खान, भाजपचे गटनेता हरीश आलीमचंदानी, सेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके, काँग्रेस गटनेता दिलीप देशमुख, गटनेता गंगा शेख बेनीवाले, भारिपचे गटनेता गजानन गवई, सेना उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मनपाला प्राप्त झालेले जकातचे ३ कोटी रुपये पाचव्या वेतन आयोगाच्या रकमेवर वळती करण्याचे ठोस आश्वासन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिले. आ.बाजोरियांची मध्यस्थी व आयुक्तांची भूमिका लक्षात घेता, संघर्ष समितीने संप मिटल्याचे जाहीर केले.
अकोला मनपा कर्मचा-यांचा संप, कामकाज विस्कळीत
By admin | Updated: March 3, 2015 01:08 IST