अकोला : बुद्ध पौर्णिमा अर्थात भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी बुधवारी अकोल्यात उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंतीनिमित्त तथागत भगवान बुद्धाला वंदन करण्यासाठी शहरातील अशोक वाटिकेत बौद्ध अनुयायांची गर्दी उसळली होती.जगाला शांती, अहिंसा व मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी बौद्ध विहारांमध्ये सकाळी सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करून भगवान बुद्ध यांना वंदन करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमांमधून तथागत बुद्ध यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. बुद्ध जयंतीनिमित्त सकाळपासूनच अशोक वाटिकेत बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. सामूहिक त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना घेऊन, भगवान बुद्ध यांना वंदन करण्यात आले. तथागत बुद्ध यांना वंदन करण्यासाठी सकाळ व सायंकाळी अशोक वाटिका परिसरात बौद्ध उपासक-उपासिका व अनुयायांची गर्दी झाली होती. त्यामुळे हा परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलला होता. बुद्ध जयंतीनिमित्त अशोक वाटिका परिसरात आकर्षक रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच पुस्तके, पूजेचे साहित्य व विविध वस्तूंची दुकानेही अशोक वाटिका परिसरात थाटली होती. नागरिकांच्या गर्दीने या परिसराला जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसत होते.
अकोल्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात!
By admin | Updated: May 14, 2014 23:06 IST