आकोट (जि. अकोला), दि. १२ : भविष्यातील संघटित समाज व्यवस्थेकरिता तसेच कोपर्डी येथील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा, मराठा आरक्षण, अँट्रॉसिटी अँक्टमध्ये दुरुस्ती आदींकरिता सकल मराठय़ांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असा सूर आकोट येथे १२ सप्टेंबर रोजी स्थानिक कास्तकार सभागृहात पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत उमटला. मराठा क्रांती मोर्चाच्या तालुकास्तरीय बैठका पार पडत आहेत. अकोला येथे १९ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता तसेच नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आजपर्यंतच्या काळात मराठा समाज एकत्र येण्याची ही पहिली वेळ असून, समाजातील सर्व पोटजातींनी कोणताही वाद न बाळगता एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी अकोला येथील सभेबाबत तालुकास्तरीय नियोजन करण्यात आले. वाहन व्यवस्था, पार्कींग तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती, प्रत्येक गावात बैठका घेऊन या मोर्चाला सहकुटुंब उपस्थित राहण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात यावी. बैठकीत उपस्थित समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने वाहने उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. तालुक्यातील समाजबांधवांना या मोर्चात सहभागी होण्याकरिता नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. या सभेला आकोट तालुक्यातील मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी स्टिकर व बॅनरचे वितरण करण्यात आले. आकोट येथे प्रथमच मोठय़ा संख्येने विविध क्षेत्रात काम करणारे मराठा समाज बांधव एकत्र आले होते. उपस्थितांनी हजारोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचा संकल्प यावेळी घेतला.
आकोटात मराठा समाजाच्या नियोजन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: September 13, 2016 03:00 IST