विवेक चांदूरकर / अकोलाअकोला : एक वर्षापासून दुष्काळ जणू शेतकर्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. गत दोन दिवस झालेल्या अवकाळी अतवृष्टीने आधीच गलितगात्र झालेल्या शेतकर्यांचे कंबरडेच मोडले असून, कशातरी तग धरून असलेल्या केळी, संत्रांच्या फळबागा व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम हातचा गेल्यानंतर या पावसामुळे उरले सुरले पिकाचेही नुकसान झाले आहे. गत वर्षी खरीप हंगामावेळी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. मात्र, आवश्यकता असताना पाऊस आला नाही. परिणामी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. कोरडवाहू शेतकर्यांचा तर लागवडीचाही खर्च निघाला नसून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वर्हाडातील ६0 ते ७0 टक्के शेतकर्यांना खरीप हंगामात तर फटका बसलाच, मात्र परतीचाही पाऊस न आल्याने रब्बी हंगामातही पेरणी करता आली नाही. त्यानंतर कमी प्रमाणात का होईना, शेतकर्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांची पेरणी केली.ओलिताची सोय असलेल्या शेतकर्यांनी कमी पाण्यातही केळी व संत्र्यांच्या फळबागा जगविल्या. भाजीपाल्याचे पीक घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच जणू शेतकर्यांच्या उण्यावर टिपून असलेला पाऊस धडकला. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे संत्रा व केळी या फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.केळीच्या बागा झोपल्या असून, संत्री गळून पडली आहेत. तेल्हारा, पातूर, आकोट तालुक्यातील पणज भागातील, केळी व संत्रा फळबागांचे नुकसान झाले. तसेच शेतात पाणी साचल्याने भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आकोट, पातूर- नंदापूर, बाश्रीटाकळी, अकोला तालुक्यातील चांदूर या भागात भाजीपाल्याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.भाजीपाल्यासोबतच लाखो हेक्टरवरील कपाशीची झाडे काळी पडली असून, झोपली आहेत. कपाशीची बोंडेही ओली होऊन खाली पडली. तसेच दोन दिवस संततधारमुळे तुरीच्या शेंगामधील दाणे फुगले असून, शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची थोडी आस असलेली कपाशी व तुरीचेही नुकसान झाले आहे.
दुष्काळ पुजला पाचवीलाच!
By admin | Updated: January 3, 2015 01:29 IST