अकोला- दिवाळीमध्ये विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गुरुवार व शुक्रवारी गांधी रोडवरील मुख्य बाजारपेठेत आलेल्या २0 ग्राहकांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या असून, पोलिसांनी दोन प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, १८ प्रकरणाची नोंद घेतली आहे. गांधी रोड, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह, वाशिम स्टॅन्ड परिसरात दिवाळीमध्ये विविध साहित्य खरेदीचे दुकान लावण्यात आले होते. या दुकानांमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल अलगद पळविण्यात आले. बाजारपेठेतील गर्दीच्या संधीचे सोने करीत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २0 ग्राहकांच्या खिशातील मोबाईल पळविले असून, यामध्ये काही मोबाईल महागड्या किमतीचे असल्याचेही ग्राहकांनी तक्रारीत नोंद केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी रविवारपासून बाजारात गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटेही सक्रिय झाले आणि त्यांनी तीन ते चार दिवसांच्या कालावधीत बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या खिशातून मोबाईल चोरी केले. तीन ते चार दिवसांमध्ये पोलिसांकडे मोबाईल चोरीच्या तब्बल २६ तक्रारी आल्या असून, त्यापैकी ५ ते ६ ग्राहकांचे मोबाईल मिळाले मात्र २0 ग्राहकांचे मोबाईल चोरट्यांनी पळविले आहेत. यामध्ये दोन चोरी प्रकरणाच्या तक्रारीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, १८ प्रकरणांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
चोरट्यांची ‘दिवाळी’
By admin | Updated: October 25, 2014 01:05 IST