अकोला: व्यापारी व खरीददारांच्या आडमुठय़ा धोरणामुळे बुधवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकरी व व्यापार्यांमध्ये वाद झाला. व्यापार्यांनी खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे बाजार समिती परिसरात पाणी साचले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल पोत्यांमध्ये ठेवून त्यांची पाहणी व्यापारी करतात. माल बघितल्यावर व्यापारी खरेदी करीत होते. मात्र, गत काही दिवसांपासून शेतमाल पूर्ण जमिनीवर टाकून खरेदी केली जात आहे. यामध्ये शेतकर्यांना फायदा होत आहे. मंगळवारी रात्री पाऊस आल्यामुळे बाजार समितीत पाणी साचले. त्यामुळे शेतकर्यांनी खरीददारांना शेतमाल जमिनीवर न टाकता पोत्यातून माल पाहून खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, व्यापार्यांनी शेतमाल जमिनीवर टाकून नंतरच त्याची खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यावर आणखी दोन दिवस पावसाची शक्यता असून, जमीनही ओली आहे. शेतमाल जमिनीवर टाकला तर त्याची प्रत घसरेल. त्यामुळे पोत्यातील मालाचीच खरेदी करण्याची विनंती शेतकर्यांनी व्यापार्यांना केली. मात्र, व्यापार्यांनी जमिनीवर माल टाकल्याशिवाय खरेदी करणारच नाही, असे धोरण ठरविले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकरी व व्यापार्यांमध्ये वादही झाला. मात्र, व्यापार्यांनी माल खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे बुधवारी खरेदी बंद होती. शेतकर्यांचा शेतमाल बाजार समितीत पडून आहे. गुरुवारी पाऊस झाला तर शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बाजार समितीत शेतकरी व्यापा-यांमध्ये वाद
By admin | Updated: February 12, 2015 01:18 IST