अकोटः शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने तालुक्यातील वडाळी सटवाई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना पदावरून अमरावती विभागीय आयुक्त यांनी अपात्र घोषित केले आहे.
अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई गट ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच प्रभाकर नथ्थुजी वानखडे, उपसरपंच सिंधू प्रकाश गडम, सदस्य सचिन विनायक रेळे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य दीपक प्रल्हादराव रेळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीनंतर चौकशी अहवाल, लेखी जबाब, लेखी युक्तिवाद या प्रकरणात घेण्यात आले. या प्रकरणातील दाखल सर्व कागदपत्रे लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्याने सरपंच प्रभाकर वानखडे, उपसरपंच सिंधू गडम, सदस्य सचिन रेळे यांना पदावरून अपात्र घोषित केले आहे.