ऑनलाइन लोकमतपातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत शिरपूर चांगेफळ गट ग्रामपंचायतमधील सरपंच व ग्रामसेवकाने शासनाकडून मंजूर झालेल्या लाभार्थीच्या घरकुलाच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केल्याची तक्रार एका नागरिकाने गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यामुळे पातूर पंचायत समितीमध्ये खळबळ माजली आहे.शिरपूर चांगेफळ गट ग्रा. पं.मधील तक्रारकर्ता लाभार्थी अमीनउल्लाखा हमीदउल्लाखा यांचे नाव शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाच्या यादीमध्ये समाविष्ट होते. संबंधित लाभार्थी हा भूमिहीन मजूर आहे. दररोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, हे त्याचे नित्याचे काम आहे; मात्र २०१७ पासून त्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपल्या घरकुलाच्या फाइलवर सही करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक पैसे मागत असल्याची तक्रार २२ मे रोजी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला व गटविकास अधिकारी पं. स. पातूर यांच्याकडे दिली असून, न्याय न मिळाल्यास कुटुंबीयासह पातूर पं.स.समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
सदरप्रकरणी आपणास तक्रार प्राप्त झाली असून, चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू.- शेखर शेलार, गटविकास अधिकारी, पं. स. पातूर.