अकोला, दि. ३0- राज्यात आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे विशेष पथक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी बाश्रीटाकळी येथील रुग्णालयांवर केलेल्या कारवाईत अनेक गैरप्रकार समोर आले. होमिओपॅथीची डिग्री असलेले डॉक्टर अँलोपॅथीची प्रॅक्टिस करीत असून, रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता नसल्याचे तपासणीतून पुढे आले.विशेष पथकाने गुरुवारी बाश्रीटाकळीतील डॉ. गजानन हातोले यांचे श्रीराम क्लिनिक, डॉ. गुलाम रसुल इनामदार यांचे हॉस्पिटल, टाकळकर होमिओपॅथी क्लिनिक, इंडियन मेडिकल, काठोळे क्लिनिकल लेबॉरटरी यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान वरील सर्व ठिकाणी विविध त्रुटी आढळून आल्या. यामध्ये ग्राम, नगरपंचायतचा परवाना नसणे, बायोमेडिकल वेस्ट कायदा, प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे प्रमाणपत्र नसणे, अग्निप्रतिरोधक यंत्रणा नसणे आदी त्रुटी आढळून आल्या. तसेच होमिओपॅथी दवाखान्यात रुग्णांना इंजेक्शन, सलाइन लावल्या जात असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर मुदतबाहय़ औषधांचा साठाही आढळून आला. एमबीबीएस डॉक्टर आबीद हुसेन यांच्या हॉस्पिटलची तपासणी केली असता, सदर रुग्णालय चालविण्यासाठी ग्राम, नगरपंचायतचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणा बसविलेली नसल्याचे दिसून आले. दवाखान्यात कोणत्याही प्रकारच्या नोंदी नसल्याचे निदर्शनास आले. विशेष पथकाने तपासणी केली असून, याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीला सादर करण्यात येणार आहे.कारवाई करणार्या पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शर्मा, नायब तहसीलदार पाचपोहे, पोलीस निरीक्षक भालतिलक, अन्न व औषध निरीक्षक अस्वार, विधी समुपदेशक अँड. शुभांगी खांडे, उमेश ताठे आदींचा समावेश होता.
डिग्री होमिओपॅथीची, प्रॅक्टिस अँलोपॅथीची!
By admin | Updated: March 31, 2017 02:01 IST