अकोला : नोव्हेंबर महिन्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. अकोला-वाशिम आणि बुलडाणा मतदारसंघ तूर्तास शिवसेनेच्या ताब्यात असून, भाजपनेदेखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याबद्दल शिवसेनेचे संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत यांना विचारणा केली असता, आम्ही युतीसाठी अनुकूल आहोत. परंतु या निवडणुकीत युती ठेवायची किंवा नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर न होता शिवसेना-भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे स्पष्ट मत खा.सावंत यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संपर्कप्रमुख खा.अरविंद सावंत शहरात दोन दिवस मुक्कामी होते. जिल्हा व शहर कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठीच आम्ही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेतल्याचे खा. सावंत यांनी सांगितले. शेतकर्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शिवसैनिकांना गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवसांच्या दौर्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती बिकट असल्याचे लक्षात आले असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना अवगत केले. खारपाणपट्टय़ातील घुसर येथील शेततळ्य़ांची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतच भाजपनेदेखील तयारी सुरू केली आहे. भाजप कार्यकर्त्यांंच्या बैठका होत असल्याच्या मुद्यावर खा.सावंत यांना छेडले असता, आम्ही युतीसाठी नेहमीच सकारात्मक असतो असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत घडलेला प्रकार मनाला वेदना देणारा होता. विधान परिषदेत युती होणार किंवा नाही, याचा निर्णय सेना, भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, राजेश मिश्रा, तरूण बगेरे उपस्थित होते.
युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील!
By admin | Updated: September 5, 2015 01:48 IST