मुंडगाव (अकोला) : जालना-बीड रोडवर शेवगा फाटा येथे सोमवारी झालेल्या अपघातात मुंडगाव येथील एक भाविक ठार झाला असून, २५ जण जखमी झाले. पंढरपूर येथून परतणार्या भाविकांच्या ट्रकला दुसर्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. अजाबराव श्रीराम भिसे (वय ३८, रा. मुंडगाव) असे मृतकाचे नाव आहे. ते शेतमजूर होते. जखमींमध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथील भाविकांचा समावेश आहे. सात गंभीर जखमींना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. मुंडगाव येथील दासगिरी महाराज यांनी पंढरपूर येथे भागवत कथा श्रवण करण्यासाठी भाविकांना नेले होते. कथा १८ ते २४ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली होती. भाविकांचा ट्रक (एम.एच.२७-एक्स.-२0३) पंढरपूर येथून अंबडमार्गे अकोलाकडे जात असताना अंबड तालुक्यातील शेवगा फाटा येथे बीडकडे जाणार्या ट्रक (टी.एन.३0-ए.सी.३४0८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याच्यावर आदळला. यात भाविकांचा ट्रक चक्काचूर झाला. ट्रकमधील सर्व २५ भाविक रस्त्यावर फेकले गेले. शेवगा व धनगरपिंप्री ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तामिळनाडू येथील ट्रकचालकासह २५ जखमींना तत्काळ जालना येथे हलविण्यात आले. जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. सात गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
मुंडगाव येथील भाविक ठार; २५ जखमी
By admin | Updated: January 26, 2016 02:24 IST