अकोला : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात युवकाच्या डोक्यात लोखंडी सब्बल घालून त्याची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाशिम बायपासवरील पंचशील नगरात राहणाऱ्या मंगला श्यामराव सिरसाट (५८) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा रवी सिरसाट (३०) याचे आरोपी वर्षा मोहन तायडे (पंचशील नगर) हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. वर्षा ही विवाहित आहे. रवी सिरसाट हासुद्धा विवाहित असून, त्याला दोन मुले आहे. पत्नीला रवीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने ती त्याला सोडून माहेरी निघून गेली. आरोपी वर्षा तायडे हिच्यासोबत रवीचे अनैतिक संबंध असल्याने, ती त्याला सातत्याने लग्न करण्यास तगादा लावत होती; परंतु मंगला सिरसाट यांचा विवाहास विरोध होता. वर्षासोबत लग्न केले तर रवीचा संसार मोडेल, अशी भीती होती. त्यामुळे वर्षा तायडे हिच्यासोबत या कारणावरून नेहमीच वाद होत. २९ मार्च २०१५ रोजी वर्षा तायडे ही रवी सिरसाट याच्या घरी आली. तिने तुझ्यासोबत काम आहे, असे सांगून रवी सिरसाटला तिच्या घरी नेले. या ठिकाणी वर्षा तायडेचा पती मोहन उत्तम तायडे याने रवीसोबत वाद घातला आणि त्याच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार केले. यावेळी वर्षा तायडे याने रवीचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला. कसाबसा उठून घराबाहेर आला आणि जागीच कोसळला. मंगला सिरसाट यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपी वर्षा मोहन तायडे आणि मोहन उत्तम तायडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ (३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. ठाणेदार रियाज शेख यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने तायडे दाम्पत्याला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली.
युवकाची हत्या करणा-या दाम्पत्यास जन्मठेप!
By admin | Updated: May 12, 2017 08:38 IST