शिर्ला : पातूर तालुक्यातील आस्टूल येथे दूषित पाण्यामुळे दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे शिवराम संपत भारसाकळे या ७५ वर्षीय वृद्धाचा सोमवार, ४ मे रोजी मृत्यू झाला. या गावात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना किडनीचे आजार जडत असून, यापूर्वी येथे किडनीच्या आजाराने १५ जणांचे मृत्यू झाले आहेत. शिवराम भारसाकळे हे किडनीच्या आजाराने मृत्युमुखी पडणारे सोळावे ग्रामस्थ ठरले आहेत. किडनीच्या आजाराने होणार्या वाढत्या मृत्यूमुळे आस्टूलेच ग्रामस्थ दहशतीखाली जीवन जगत आहेत. अनुसूचित जाती व जमातीबहुल वस्ती असलेले आस्टूल गाव मोर्णा धरणाच्या पायथ्याशी आहे. येथे मागील १0 वर्षांपूर्वीपासून आतापर्यंतच्या कालावधीत किडनीच्या आजाराने सोळा जणांचे मृत्यू झाले आहेत. येथे सन २000 मध्ये आकाराम श्रावण इंगळे व दयाराम जंगलू इंगळे यांचा, २00७ मध्ये सुखदेव गोविंदा शेळके व मोतीराम लक्ष्मण खुळे यांचा, २00८ मध्ये लक्ष्मण तुकाराम करवते यांचा, २0११ मध्ये पितांबर रामजी इंगळे, इंटाबर रामजी इंगळे, त्र्यंबक पांडुरंग इंगळे, तुळशीराम लक्ष्मण खुळे ,माणिक नरसाजी इंगळे, २0१२ मध्ये मेजर रामजी इंगळे यांचा, २0१३ मध्ये नीजधाम सुपाजी इंगळे, मधुकर गोविंदराव मोरे, मोहन यशवंत इंगळे यांचा, डिसेंबर २0१४ मध्ये बबन सखाराम इंगळे यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे या सर्वांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ सोमवार, ४ मे रोजी शिवराम संपत भारसाकळे यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या गावातील आणखी दोन रुग्णांना किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहे. गावात शुद्ध पेयजलाचा पुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने दूषित पाणी प्यावे लागते. तरीही या अनुसूचित जाती-जमातीबहुल असलेल्या या गावाकडे शासकीय यंत्रणांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
आस्टूल येथील वृद्धाचा किडनीच्या आजाराने मृत्यू
By admin | Updated: May 5, 2015 01:26 IST