अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोला स्थित वसाहतीमधील फेज क्रमांक ३ मध्ये असलेल्या रवि इंडस्ट्रीजमधील एका मजुराचा डाळीच्या ढिगार्याखाली दबल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गत दोन महिन्यांच्या कालावधीत पोत्यांच्या ढिगाखाली दबल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. एमआयडीसीमध्ये असलेल्या रवि इंडस्ट्रीज येथे लोकेश मेहताब नागवंशी (२२) हा कामगार मंगळवारी दुपारी डाळीच्या मशीनजवळ काम करीत होता. मशीनच्या पाइपवरून लोकेशचा एक पाय घसरल्याने तो डाळीसाठी असलेल्या खड्डय़ात कोसळला. त्यानंतर लोकेशवर डाळीचा मोठा ढीग पडल्याने त्याखाली गुदमरून त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार रवि इंडस्ट्रीजमधील इतर मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी लोकेशला काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एमआयडीसीत काम करणार्या मजुरांना इंडस्ट्रीज संचालकांकडून आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येत नसल्याने मजुरांचा मृत्यू होत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
डाळीच्या ढिगा-याखाली दबल्याने मजुराचा मृत्यू
By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST