अकोला: कापशी रोड शेतशिवारात विजेचा झटका लागल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. दारासिंह अजाबसिंह सोळंके (२८) व गणेश साहेबराव पालवे (३३) ही मृ तकांची नावे असून, दोघांच्याही शरीराचा भाजल्याने कोळसा झाला.राजंदा येथील रहिवासी दारासिंह सोळंके व गणेश पालवे या दोघांनी सोमवारी रात्री कापशी रोड शेतशिवारातील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित असताना १२ वाजताच्या सुमारास या विद्युत वाहिनीवरील तांब्याची तार तोडली. त्यानंतर ते चिखलगावकडून कापशी रोडकडे निघाले. त्यांनी चार खांबांवरील विद्युत तार गुंडाळूनही ठेवली. कापशी रोड गावानजीक आल्यानंतर त्यांनी खांबावरील विद्युत तार कापली. या तारेखालूनच कापशी गावासाठी विद्युत पुरवठा करणारी दुसरी एक विद्युत वाहिनी गेलेली होती. या दोघांनी बंद असलेल्या विद्युत वाहिनीवरील तारेचे एक टोक ताणले व लगेच कापले, त्याच तारेचे दुसरे टोक कापशी गावाला वीजपुरवठा करणार्या दुसर्या विद्युत वाहिनीला धडकताच दोघांनाही विजेचा जबर झटका बसला. यामध्ये दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांच्या शरीरावरील सर्व कापड जळून खाक झाले. गणेश पालवे हा राजंदा येथील ग्रामस्थांचे विजेसंबंधी खासगी काम करीत होता. दारासिंह हा त्याचा मित्र होता. सोमवारी रात्री ११ ते २ वाजेपर्यंत कापशी गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या वेळेतच हा अपघात झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी गावातील काही महिला शेतशिवारामध्ये गेल्या असता, त्यांना मृतदेह दिसले. कापशी गावातून याबाबत कळविल्यानंतर पातूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविले.
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By admin | Updated: April 20, 2016 02:13 IST