तेल्हारा, दि. १८- स्थानिक बेलखेड रस्त्यावर असलेल्या बालाजी जिनिंगमध्ये १८ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास काही इसम व्यापार्याच्या कापसाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सदर व्यापारी पोहोचला. ते पाहून चोर त्यांच्यासोबत आणलेले अँपे हे मालवाहू वाहन तेथेच सोडून पसार झाले. येथील अशोक ऊर्फ हरीकिसन भिकमचंद राठी या व्यापार्याचा कापूस बालाजी जिनिंगमध्ये होता. सदर व्यापार्याचा चौकीदार तेथे चौकीदारी करीत असताना कापसाच्या गंजीवर ८ ते १0 इसम चढून चोरी करीत असल्याचे दिसले. ते पाहून चौकीदाराने सदर व्यापार्याचा दिवाणजी व मुलास घटनेची माहिती दिली. फिर्यादीचा दिवानजी व मुलगा तत्काळ घटनास्थळी हजर झाले असता, अँपे व माल टाकून चोर घटनास्थळावरून पसार झाले. अशोक ऊर्फ हरिकिसन राठी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एम.एच. २८ एच ६८५0 क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या अँपेचा चालक व ८ ते १0 इसमांविरुद्ध भादंवि ३७९, ५११ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.सहा हजार रुपये किमतीचा १ क्विंटल कापूस भरलेला पांढर्या रंगाचा अँपे पोलिसांच्या ताब्यात आल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे झाले आहे. चोरीसाठी वापरलेल्या सदर अँपेला रंग देण्यात आलेला असल्याने तो अँपे चोरीचा तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉं. गणपत गवळी, एनसीपी नागोराव भांगे, सुरेश काळे करीत आहेत.
कापूस चोर अँपे सोडून झाला पसार
By admin | Updated: February 19, 2017 02:23 IST