वाशिम : महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त आयोजित मिरवणूक, शोभायात्रांवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. एरव्ही या अनाठायी खर्चाकडे कुणी फारसे गांभीर्यानं बघत नाही; मात्र दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना, या समस्येकडे सामाजिक जाणिवेतून बघण्याची गरज आहे. याकामी पुढाकार घेतला आहे वाशिम जिलतील चर्मकार समाजबांधवांनी. या समाजाने संत रविदास जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्याचे टाळून, ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. संत रविदास जयंतीनिमित्त शोभायात्रेवर होणारा खर्च टाळून ही रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष समाधान माने यांनी दिली. उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या मार्गदर्शनात ११ फेब्रुवारी रोजी या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला जाणार आहे. संत रविदास जयंती ३ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. त्यानिमित्त जवळपास महिनाभर विविध कार्यक्रम घेतले जातात. वाशिम शहरात जयंतीनिमित्त कोणतीही मिरवणूक काढण्यात आली नाही. अतिशय साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला.
मिरवणुकीचा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी
By admin | Updated: February 11, 2015 00:53 IST